महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा शपथविधी: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री...

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

मुंबईतील आझाद मैदानावर आज महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सरकारचा पॅटर्न जुनाच ठेवत, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या फॉर्म्युल्यानुसार हे सरकार तयार झालं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सस्पेन्स संपला

शपथविधीच्या काही तासांपूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का, याबाबत सस्पेन्स होता. भाजप नेत्यांसोबत शिवसेना आमदारांच्या माणधरणीनंतर अखेर शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला.

अजित पवार यांची तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदी निवड

महायुतीच्या या नव्या पर्वात अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे राज्याच्या अर्थकारणाला आणि धोरणात्मक निर्णयांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा महत्त्वाचा निर्णय घेतला.

राजकीय प्रवासाचा नवा टप्पा

2022 मध्ये शिवसेनेतून बंड करत, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार केलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षादेश मान्य करत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं होतं. आता, 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले आहेत.

गृहखात्यावरून चर्चेत तडजोड

स्रोतांच्या माहितीनुसार, शिंदे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते, परंतु भाजपने हे खातं स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच, अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचे अर्थखाते राखण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चेनंतर अखेर शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

भव्य शपथविधी सोहळा

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील प्रमुख नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शपथविधीच्या या भव्य सोहळ्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर महायुती सरकारची ताकद अधोरेखित केली आहे.

महायुती सरकारकडून मोठ्या अपेक्षा

आता या नव्या सरकारमध्ये इतर मंत्र्यांची निवड आणि खात्यांचे वाटप कसे होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थव्यवस्थेचा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगारनिर्मिती, पाणीटंचाईचे संकट यांसारख्या प्रश्नांवर महायुती सरकार कशी कामगिरी करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या या नव्या राजकीय पर्वासाठी मोठ्या आशा-अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

अधिक बातम्या वाचा =>